मावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने या मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना तगडी स्पर्धा होती. त्यात विरोधी उमेदवार थेट पवार घराण्यातील असल्याने मावळ लोकसभा मतदासंघ प्रसार माध्यमांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला होता.
विशेष म्हणजे दोन्हीकडील उमेदवार हे आर्थिक दृष्ट्या देखील तगडे असल्याने आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्याने या लढतीत मोठी चुरस निर्माण झाली होती. शिवसेनेकडून तर लढाई कठीण दिसताच पार्थ पवार यांच्या खासगी आयुष्यातील काही व्हिडिओ अचानक समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आणि त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा हेतुपुरस्कर प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पहिलीच निवडणूक असल्याने पार्थ पवार यांच्याकडून भाषणादरम्यान अनावधानाने काही चुका देखील झाल्या होत्या. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याचे देखील भाडंवल करत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला केला.
मात्र अनुभवी पवार कुटुंबीयांनी विषय चाणाक्षपणे हाताळत प्रचारावर अधिक जोर देणं पसंत केलं. दरम्यान, पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शेकापचे पदाधिकारी देखील रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र तरीदेखील पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागल्याने हा पवार कुटुंबियांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
