मुंबई : भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली असून दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ही अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

तसेच १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार याद्या सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती दिनांक ३० जुलै २०१९ पर्यंत प्रत्येक विधानसभा मतदार संघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.

दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दिनांक १३ ऑगस्ट २०१९ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी ‍दिनांक १६ ऑगस्ट पर्यंत करुन दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुन:रिक्षण कार्यक्रमादरम्यान दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्यात येणार आहे.

पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा‍ निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट) (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर) (बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in/ या वेबसाईटवरदेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे देखील खुलं आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा: मतदार यादी दुरूस्ती व नोंदणी कार्यक्रम सुरू; अंतिम तारीख १९ ऑगस्ट