ठाणे: भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल होऊन काही दिवस उलटत नाही तोच गणेश नाईक यांना उपेक्षित वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक कार्यक्रमातून आल्या पावली माघारी परतले. त्यामुळे भविष्यात गणेश नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे कितपत जमणार, याबाबत शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. तर दुसरीकडे गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने ते कार्यक्रमातून लवकर निघून गेल्याचेही सांगितले जात आहे.
गणेश नाईक यांनी नवी मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४८ नगरसेवकांना घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. १५ वर्षे गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. शहरी आणि ग्रामीण भागात गणेश नाईक यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा नेता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, कालचा एकूणच प्रसंग पाहता गणेश नाईक भारतीय जनता पक्षामध्ये कितपत रमणार, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
”व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईक यांना कार्यक्रमातून जाताना पाहून मला दुःख वाटले. गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला व्यासपीठावर जागा न देणारी भारतीय जनता पक्ष ही खऱ्या अर्थाने ‘पार्टी विद डिफ्रन्स’ आहे.”, असे ट्विट जयंत पाटील दरम्यान, अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही.
मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला.
