मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील जवळपास सर्वच सभांमध्ये अमोल यादव या मराठी तरुणासंबंधित विषय उचलून धरला. सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचे वाभाडेच राज ठाकरे यांनी सभांमधून काढले होते. एक मराठी तरुण एवढी मोठी झेप घेतो आणि त्यानंतर त्याचा उपगोय सत्ताधारी केवळ स्वतःचं मार्केटिंग करून घेताना दिसले. सरकार दरबारी हेलपाटे घालणारा अमोल यादव जवळपास अमेरिकेत जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी त्याने प्राथमिक स्वरूपात संपर्क देखील केला होता. सरकार दरबारी सदर विषय जवळपास दुर्लक्षित झाला होता.
मात्र राज्यभर झालेल्या सभांमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा विषय उचलून धरला आणि प्रसार माध्यमांनी सदर विषय उचलून देखील धरला. परिणामी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचे देशभर वाभाडे निघत असताना झोपी गेलेल्या सत्ताधारी भाजपाला जाग आली असून अमोलच्या मागणीला यश आलं आहे. सक्षम विरोधी पक्ष का असावा याचा राज ठाकरेंच्या प्रचारातून मिळालेला हा पुरावा असावा अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
दरम्यान प्रायोगिक विमान तयार करणारे मुंबईकर वैमानिक अमोल यादव यांची मनसेच्या सभेत बातमी फिरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत तातडीने चक्रे फिरून यादव यांना विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून मंजुरी मिळाली आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी १८ वर्षे खर्च केली आहेत.
नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) नियमानुसार ‘उड्डाणाचा परवाना’ (परमिट टू फ्लाय) मिळण्याच्या प्रक्रियेला मंजुरीसाठी २०११ सालापासून यादव यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून त्यांना तीन दिवसांपूर्वीच ही मंजुरी मिळाली. रविवारी पंतप्रधानांशी संवाद साधताना कॅप्टन यादव यांनी, आपले स्वप्न साकारण्यासाठी मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
