फलटण: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेतात, याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले आहे. उदयनराजेंनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज अचानक शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे राजेंच्या मनात नेमकं काय चाललंय, याची उत्कंठा वाढली असतानाच राजेंचा भारतीय जनता पक्षात जाण्याचा अंतिम निर्णय झाल्याचे वृत्त पुढे येऊ लागले आहे.

दरम्यान, त्यानंतर फलटणवरून सूत्र हलण्यास सुरुवात झाली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि फलटणचे आमदार वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच आमदार आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा घेतल्याचे ऊत आहे.

उदयनराजे भाजपात जाणार, त्यामुळे रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार