मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.

पुढे बोलताना आंबेडकर यांनी ‘सरकारमध्ये संवेदनशीलता अजिबात राहिलेली नाही. सरकारने अजिबात मदतीकडे लक्ष दिलं नाही. कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार मोडून पडलेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक रकमी पैसे खर्च करण्याचे आदेश द्यावेत’ अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरही पाणी साठलं होतं. ते हळूहळू ओसरु लागलं आहे. सांगलीत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात मात्र पावसाचा कहर सुरुच आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.

शिवसेना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात व्यस्त; पूरग्रस्तांशी देणं-घेणं नाही