औरंगाबाद: औरंगाबादेतील शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करीन, हे माझं वचन आहे, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे सत्तास्थापनेची लगबग सुरु असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.
‘माझं वचन आहे, आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करेन. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील’, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. मत देताना तुम्ही आधार कार्ड किंवा कागदपत्रं विचारली नाहीत, आम्ही पण तुम्हाला कागदपत्रं विचारणार नाही. सर्व अडथळे बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत देऊ, अशी हमी उद्धव ठाकरे यांनी दिली.

या संकटात शिवसेना तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्ही माझे कुटुंबीय आहात. तुम्हाला कुटुंबीय म्हणून वचन देतो. परिस्थिती दुर्दैवी आहे. पण खचून जाऊ नका. १० हजार कोटी पुनर्वसनासाठी पुरेसे नाहीत. जे धाडस कुणीही करणार नाही, ते धाडस तुम्ही करता. माझा शेतकरी मर्द आहे. तो या संकटावर मात करेल. माझी ताकद आत्महत्या करत असेल तर मी जगू कसा. म्हणून आत्महत्येचा विचार करू नका असा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
तत्पूर्वी, राजकीय सौदेबाजीत व्यस्त झालेल्या भाजप आणि शिवसेना नेत्यांपेक्षा शरद पवार मात्र अपवाद ठरले आणि त्यांनी सर्व राजकीय घटनाक्रमकडे दुर्लक्ष करत राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर प्रसार माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीका होताच भाजप सेनेचे नेते दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत तर फडणवीस देखील पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत.
तत्पूर्वी राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. शरद पवार शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले होते. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
पवार यांनी दवंगे या शेतकऱ्यांकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली होती. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला होता. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		