26 May 2022 8:56 PM
अँप डाउनलोड

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला एटीएस'कडून अटक

जालना : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वेगाने सूत्र हलताना दिसत आहेत. नालासोपारा ते औरंगाबाद मधून आधीच काही संशयितांना अटक झाली असताना आता शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर वय ४१ वर्ष याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जालना येथून ताब्यात घेतले आहे.

मुंबई तसेच पुण्यातील एटीएस’ची टीम सकाळपासूनच श्रीकांत पांगारकरच्या घरावर पाळत ठेऊन होते. त्यानंतर त्यांना मिळालेल्या खात्रीनंतर एटीएसने महसूल कॉलनीतील ‘राधेय’ या त्यांच्या घरातून पांगारकर यांना ताब्यात घेतल्याचे स्थानिक सूत्रांनी माध्यमांना सांगितलं. श्रीकांत पांगारकर याने शिवसेनेकडून दोन वेळा नगरसेवक पद भूषवलं आहे. श्रीकांत पांगारकर हा कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच जालन्यात परिचित असल्याचं स्थानिक लोकं सांगतात.

श्रीकांत पांगारकर काही काळ गोवा आणि कोल्हापूर परिसरात वास्तव्यास होता अशी माहिती सुरक्षा यंत्रणांकडे होती. एटीएस’ची टीम जेव्हा पांगारकर यांच्या घरी दाखल झाली तेव्हा त्याच्या कुटुंबाने सर्व आरोप फेटाळत आमच्या मुलाला जबरदस्तीने अटक केली जात असल्याचा आरोप केला होता. परंतु पांगारकर पाळत ठेऊन असलेल्या पोलीस यंत्रणेला त्याच्या सर्व हालचालींची माहिती होती. त्यांनंतरच त्याला अटक करून एटीएस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झालं अशी माहिती स्थानिक सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शिवसेनेचा दोन वेळा नगरसेवक राहिलेला पांगारकर याला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एटीएस’कडून अटक झाल्याने शिवसेना सुद्धा राजकीय अडचणीत सापडली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x