मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
सत्तेत असून शिवसेना म्हणते की, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आम्ही बघून घेऊ. शिवसेनला अजून देखील कळेना, आपण विरोधीपक्षात आहे की सत्ताधारी पक्षात. असा सणसणीत टोला अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला. परदेशी दौरे पूर्ण झाली आहे शिवसेनेचे, दौरे पूर्ण झाल्यांनतर आता त्यांना दुष्काळाची आठवण येत आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी सेनेला लगावला.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत परिस्थिती रहणार नाही. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले. जनतेने आम्हाला पंधरा वर्षे संधी दिली होती,त्यामुळे, त्या जनतेसाठी जे-जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे पवार म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावरूनही अजित पवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला. भावनिक मुद्दे हाती घेऊन सेना मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. शिवसेना राम मंदिराचा विषय पुढे करून फक्त राजकरण करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
