13 November 2019 11:59 PM
अँप डाउनलोड

पराभवाच्या छायेतील ते सहा मंत्री कोण? राजकीय चर्चा रंगली

BJP, Maharashtra Vidhansabha Election 2019, Pankaja Mundey, Chandrakant patil, Ram Shinde

कर्जत: ‘लोकसभेच्या वेळेस सात वेळा मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आले. अमित शहा आले, चंद्रकांत पाटील आले, पण मी निवडून आले. आता हा ‘बारामती पॅटर्न’ आपल्याला कर्जत-जामखेडमध्ये दाखवायचा आहे,’ असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे मंत्री राम शिंदे पडणार आणि रोहित पवार निवडून येणार, असं मी नाही, भारतीय जनता पक्ष म्हणत आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणूक सर्व्हेचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी रोहित पवार यांना निवांत राहण्याचा सल्ला दिला.

सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक सर्व्हेचा दाखला देत विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सहा मंत्री अडचणीत असल्याचं सांगितलं. ‘मी परवा बातम्या बघत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचा एक सर्व्हे आल्याचं सांगितलं गेलं. सहा मंत्रीच पराभवाच्या छायेत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष चिंतेत असल्याचं यात दाखवलं. हा भारतीय जनता पक्षाने केलेला अंतर्गत सर्व्हे आहे, असं बातम्यांमध्ये म्हटलं. मी नाही म्हणत’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एनसीपीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ सुळे यांची कर्जतमध्ये गुरुवारी सभा झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व्हेमध्ये सहा मंत्री अडचणीत असल्याचे दाखवले जात आहे. त्यामध्ये राम शिंदे यांचेही नाव आहे. आता राम शिंदे हे नापास होणार हे भारतीय जनता पक्षाच म्हणत असेल, तर रोहित तुम्ही निवांत राहा,’ असा टोलाही सुळे यांनी या वेळी राम शिंदे यांना लगावला. ‘रोहित पवार दीड-दोन वर्षांपासून आमच्या भागात दिसत नाहीत. पण काही जण त्यांना बाहेरचे पार्सल म्हणतात. पण ग्रामीण भागातील लोक हुशार असतात. जर कोल्हापूरवरून पुण्याला आलेले चंद्रकांत पाटील तुम्हाला चालतात, मग आमच्या बांधाला बांध असणारे लोक तुम्हाला का चालत नाहीत, असे उत्तर कर्जत-जामखेडचे लोकच त्यांना देत आहेत,’ असेही त्या म्हणाल्या. ‘कोणत्याही संघटनेमध्ये नवीन आणि जुने यांची सांगड महत्त्वाची असते. बारामतीला जेवढ्या मताने दादा निवडून येतील, तेवढ्याच मताने रोहित कर्जत-जामखेडमधून निवडून येतील, असा विश्वास आहे,’ असे सुळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यात भाजपला तब्बल ४० जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एकूण ६ मंत्री पराभवाच्या छायेत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र ते नेमके मंत्री आणि मतदासंघ कोणते ते स्पष्ट केलेलं नाही हे विशेष. दरम्यान, कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरुद्ध राम शिंदे, परळी’मध्ये पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध धनंजय मुंडे आणि कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे मैदानात असून येथे विरोधकांचे पारडे जड असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(340)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या