मुंबई: राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. मात्र, राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार हुसेन दलवाई म्हणाले, राज्यात आम्ही राष्ट्रपती राजवट येऊ देणार नाही. त्यासाठी शिवसेनेशी आमचे हायकमांड चर्चा करीत आहेत. तसेच याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी निर्णय घ्यावा. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये असे आम्ही म्हणतोय याचा अर्थ बराच आहे, अशा शब्दांत दलवाई यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला काँग्रेसचा हिरवा कंदील असल्याचे सुतोवाच केले आहे.
No new proposals will be exchanged with BJP, except “50:50” : Sanjay Raut
Read @ANI Story | https://t.co/Xmn6pzysLn pic.twitter.com/8WQvr91K4q
— ANI Digital (@ani_digital) November 6, 2019
हुसेन दलवाई सामना कार्यालयात संजय राऊतांच्या भेटीसाठी आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. परंतु, शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांच्यासह काही ज्येष्ट नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली आहेत. तर हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम यांच्यासह पक्षातील तरुण नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत.
