मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटले तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत असताना आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी १९९५ चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं एनसीपीच्या नेत्याच्या हवाल्यानं दिलं आहे.

राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं यासाठी उद्धव ठाकरेही आग्रही आहेत. त्याचमुळे त्यांनी आम्हाला राज्यपालांकडे पाठवलं होतं. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत शिवसेनेची भूमिका काय याची माहिती त्यांनी आम्हाला राज्यपालांना द्यायला सांगितली त्याच अनुषंगाने आम्ही राज्यपालांची भेट घेतली असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात अशी एक चर्चा आहे त्याबाबत काय सांगाल असा प्रश्न जेव्हा राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा या अफवांवर विश्वास ठेवू नका असे राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षामधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली आहे. शिवसेनेचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमिवरच शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वत: आम्हाला राज्यापालांकडे पाठवले होते. राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, काय घडतंय पडद्यावरचं आणि पडद्यामागचं हे राज्यपालांना सांगणे शिवसेनेचे कर्तव्यच असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्यात काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर शिवसेना-एनसीपी’चे सरकार येणार का यावरही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या नव्या समीकरणावर बोलण्याचे टाळत, राऊत यांनी मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार: खा. संजय राऊत