मुंबई: सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. ठाकरे सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांचाही समावेश आहे. मात्र, अस्लम शेख यांच्या नावाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आक्षेप घेतला आहे.

‘२०१५ मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचं कामकाज स्थगित केलं होतं. अस्लम शेख यांना २०१५ मध्ये शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं, मात्र तेच आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाले’ असं सोमय्या म्हणाले.

 

Web Title:  Former BJP MP Kirit Somaiya on Congress MLA Aslam Shaikh Being Cabinet Minister in Maharashtra Thackeray Government.

उद्धवा, अजब तुझे सरकार… किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र