मुंबई: परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या अडीच महिन्यांच्या प्रिन्सचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सची काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. तो उपचारांना काहीसा प्रतिसाद देत नव्हता. शिवाय, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्या प्रकृतीबाबतची सर्व माहिती पालकांना देण्यात आली होती.
मात्र, गुरुवारी मध्यरात्री प्रिन्सचा मृत्यू झाला आहे. केईएममध्ये दोन आठवड्यांपूर्वी व्हेंटिलेटरच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे यात भाजलेला प्रिन्स मृत्यूशी झुंज देत होता. तरीही, हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रिन्सच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. केईएम हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सच्या रिपोर्टमध्ये न्यूमोनिया असल्याचे समोर आले होते. शिवाय, त्याच्या खाण्या-पिण्यावरही मर्यादा आल्या होत्या.
रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास प्रिन्सचं ह्रदय बंद पडलं. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. प्रिन्स आणि त्याचे कुटुंब मुळचे वाराणसीचं आहे. वाराणसीच्या शासकीय रुग्णालयात प्रिन्सच्या हृदयविकाराचे निदान झाले. उपचार, शस्त्रक्रियेसाठी तेथील डॉक्टरांनी प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्याचे वडील पन्नेलाल राजभर यांनी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं.
तीन महिन्याच्या प्रिन्सला १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील ५ लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते.
या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने चौकशी समितीही नेमली आहे. समितीचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. या तपासामध्ये लागणारी सगळी वैद्यकीय उपकरणेही पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवली आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप आलेला नाही, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
