मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

माझ्यासमोर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय झालेला नव्हता. किंबहुना या विषयावरूनच बोलणी फिसकटली होती. ती थांबवली गेली. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली, त्या वेळी हा विषय नव्हता. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षांची चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही. पण मी राष्ट्रीय अध्यक्षांना आणि गडकरींनाही याविषयी विचारलं. भारतीय जनता पक्षाने असा कुठलाही शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून ठणकावून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपची पोलखोल केली होती. तसाच अंदाज आज उद्धव ठाकरेंचा पाहण्यास मिळाला.

एकीकडे मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचा धरसोड वृत्तीचा अनेकांना कंटाळा आला होता आणि भाजपसोबत स्वतःची आणि पक्षाची फरफट करून घेताना उद्धव ठाकरेंमध्ये ठाकरी बाणाच नसल्याचं अनेकांचं मत बनल्याचं पाहायला मिळत होते. अगदी सध्याच्या घडोमोडींवर देखील अनेकांना पुन्हा तसंच अपेक्षित होतं. मात्र वास्तविक घडलं त्याउलट, कारण उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यासर्वांनाच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आणि काय करायचं ते करा मी देखील खंबीर आहे असा सज्जड दमच दिला. मात्र त्यांचा ठाकरी बाणा महाराष्ट्राला आश्चर्यचकित करून गेला जो केवळ स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्यामध्ये पाहायला मिळायचा. मात्र उद्धव ठाकरेंचा तोच ठाकरे बाणा अनेकांना काल आवडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी निर्णयावर ठाम राहून पक्ष वाढवावा असं म्हटलं आहे. भाजप पक्ष दिल्ली ते गल्ली शिवसेनेला शिस्तबद्ध संपवत आहे हे त्यांना वेळीच उमगलं आहे याचा आनंद आहे, कारण त्याचे दूरगामी परिणाम भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या पिढीला भोगावे लागले असते असं अनेकांनी म्हटलं आहे.

उद्धव यांचा ‘ठाकरी बाणा’ महाराष्ट्राला भावला; ठाम राहण्याची अपेक्षा