मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरुन तसे संकेत मिळत आहे.
मनसेच्या सध्याच्या झेंड्यामध्ये पाचरंग आहेत. या झेंड्याच्या मध्यभागी भगवा तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूला हिरवा रंग आहे. परंतु मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. स्थापनेनंतर तब्बल १४ वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदलणार असल्याचं चर्चा आहे.
मनसेकडून सध्या वापरत असलेला झेंडा बदलून नवीन झेंडा आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक हँडलवरुन मनसेचा झेंडा हटवण्यात आला असून फक्त पक्षाचं चिन्ह इंजिन वापरण्यात आलं आहे. एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार मनसेचा नवीन प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून त्याला मान्यताही मिळाल्याची माहिती आहे.
मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Maharashtra Navnirman Sena to launch a new party flag with saffron color.
