मुंबई: दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आलं आहे. दरम्यान उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची अजिबात दखल घेतली नाही. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील शिवसेनेते तिकीट दिले आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर ते वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

२०१४-१५ मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आधी शिवसेनेचे बाळा सावंत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महाडेश्वरांसाठी सेफ मानला जात आहे. दरम्यान २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. बाळा सावंत यांचा मृत्यू झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी मातोश्रीच्या अंगणातच सेनेला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसने नारायण राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र तगडा उमेदवार दिल्याने बिथरलेल्या शिवसेनेने भावनिक विषयाला हात घालून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना पुढे करत निवडणूक जिंकली.

मात्र आता भावनिक मुद्दा नसल्याने आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करून त्याजागी विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारी नाकारल्याने सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी त्या अर्ज भरतील, अशी माहिती त्यांचे पुतणे भूषण सावंत यांनी दिली. विभाग प्रमुख आमदार अनिल परब यांच्या हस्ते विश्वनाथ महाडेश्वरांना ए बी फॉर्म देण्यात आला.

अखेर मातोश्रीच्या मतदारसंघातच आमदाराचं बंड; तृप्ती सावंत अपक्ष म्हणून रिंगणात