मुंबई: राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भारतीय जनता पक्षाकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. याशिवाय अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, असंही ठरलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांना बैठकीत दिली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडून लेखी प्रस्ताव येणं अपेक्षित आहे. त्यामुळे लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे कुठलाही निर्णय घेणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा होईल आणि त्यात फॉर्म्युला ठरवला जाईल. सत्तेत लहान भाऊ, मोठा भाऊ हे क्षमतेवरच ठरतं. पण चर्चा करून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतात. तशी मागणी शिवसेनेतूनही करण्यात आलीय, असं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना