मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. यावरूनच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री हे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजपला तोडलंय पण पूर्णपणे त्यांच्यासोबतचे संबध त्यांना तोडायचे नाही. तसेच महाविकास आघाडीकरून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जे नव्याने मैत्री केली आहे, ती सुद्धा तशीच टिकवून ठेवायची आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे दोन्ही बाजूने बोलत असून, एकाच वेळी दोन्ही दगडांवर पाय ते ठेवत असल्याचा टोला आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता हा असा आरोप केला होता. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं होतं.
पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले होते की, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हा देखील गंभीर प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.” असं ते म्हणाले होते.
दरम्यान, ‘एनआरसी व एनपीआरच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी जी भूमिका मांडली आहे, तीच भूमिका आम्हा सर्वांची आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते या नात्याने शरद पवारांनी जे मत मांडले आहे, तेच पक्षाचे व आम्हा सर्वांचेही मत आहे, असं अजित पवार म्हणाले.
Web Title: Story Anandraj Ambedkar criticizes Chief minister Uddhav Thackeray CAA NRC.
