मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक करत शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथील त्यांच्या पहिल्या जाहीर सभेत केले.
शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, इतकी वर्ष शिवसेना युतीत सडली. त्या अनुषंगानेच कालच्या गोरेगाव येथील सभेत राज ठाकरेंनी उद्धव यांना टोला लगावला होता “आमची वर्षे युतीत सडली आणि 124 जागांवर अडली”. तसेच ईडीच्या चौकशीमुळे माझे थोबाड बंद होणार नाही, असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला.
सुनिल तटकरेंच्या मते राज यांची मागणी कौतुकास्पद आहे कारण त्यांना त्यांचा सध्याचा आवाका माहित आहे आणि त्यांनी केलेली प्रबळ विरोधी पक्षाची मागणी देखील योग्य आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करते आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे हे जमिनीवर आहेत कारण त्यांना माहित आहे कि त्यांचे किती उमेदवार आहेत आणि ते किती जागा जिंकू शकतात. त्यांच्या या भूमिकेचा त्यांनी नक्कीच सखोल अभ्यास केला असेल. परंतु मला आश्चर्य वाटतं की 124 जागा लढवणारा शिवसेना पक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वबळावर कसा काय करणार हे गणित मला समजत नाही, असा उपरोधिक टोला सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
स्वबळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्या थोड्याफार ज्ञानानुसार 145 जागांची गरज आहे. परंतु शिवसेना 124 जागा लढवूनही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतेय. राज ठाकरेंची भूमिका वस्तुस्थितीवर आधारित आहे. तसेच, राज यांची स्वच्छ मनाची भूमिका दिसत आहे. त्यांना सक्षम विरोधीपक्ष द्यायचा आहे, असे म्हणत तटकरेंनी राज ठाकरेंचे कौतुक करताना शिवसेनेला चांगलाच टोला लगावला.
