नागपूर : नागपूरमधील तुफान पावसामुळे नागपूर महापालिकेच्या ढिसाळ पायाभूत सुविधा आणि त्याच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधां संदर्भातील महत्वाचं खातं नितीन गडकरींकडे, राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे आणि नागपूर महापालिकेची सत्ता असताना सुद्धा नागपूर शहरात झालेल्या तुफान पावसाने शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली आहे.
विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून भाजपची चांगलीच राजकीय अडचण झाले आहे. अगदी सामान्य जनता ते नेते मंडळी सर्वांनाच निसर्गाने सारखा न्याय दिला आहे. परंतु त्यामुळे अधिवेशनाला स्थागिती देण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली आहे. शहरातील पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून सर्व ठिकाणी फक्त पाणीच पाणी असं चित्र आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा झाली आहे. इतकंच नाही तर आजूबाजूच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी सुद्धा लोकांना पाणी साठविण्याच्या ‘ड्रमा’चा आधार घ्यावा लागला आहे असं चित्र आहे. विरोधकांनी सुद्धा सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली असताना मित्र पक्ष शिवसेनेने सुद्धा भाजपवर टीका केली आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		