रायगड : शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. प्रकाश देसाई केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. जिल्ह्यात उद्योग असून सुद्धा स्थानिक शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गितेंना निवडणुकीच्या तोंडावर लक्ष केलं आहे.

त्यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सध्या रायगड जिल्हा शिवसेनेत खळबळ माजली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हे बंड पुकारलं गेल्याने वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे प्रकाश देसाई हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे निकटवर्तीय मानले जातात. परंतु मंत्रिपद असून सुद्धा जिल्ह्यात बेरोजगारी वाढल्याने स्थानिक बेरोजगार शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात अनेक उद्योग असताना सुद्धा अनेक शिवसैनिक बेरोजगार असल्याची भावना प्रकाश देसाई यांनी व्यक्त केलीय. मागील ३ वर्षे देसाई रायगड जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. असं असाल तरी यापुढे शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

तरी सुद्धा लवकरच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या विरुद्ध कोकणात बंड पुकारलं जाण्याची शक्यता स्थानिक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सध्या देसाई हे स्थानिक नाराज शिवसैनिकांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.

Shivsena Raigarh jilha pramukh prakas desai resigned from the post before upcoming election