अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अनेक पक्ष जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्याअनुषंगाने अमरावतीच्या लोकसभा आखाड्यात सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणांचा लोकसभेच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असल्याचं वृत्त आहे.

सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर पाठिंबा मिळणार का याच उत्तर अजून मिळालेलं नाही. परंतु त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या युवा स्वाभिमान पार्टीकडून त्या लोकसभेच्या आखाड्यात उतरतील असं समजतं. दरम्यान, अमरावती मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना युती झाल्याने दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यासाठी ही लढाई सोपी राहिलेली नाही याचा प्रत्यय नवनीत कौर राणांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून लक्षात येईल.

दरम्यान, “जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती”, “जीत पक्की, टी.व्ही. नक्की” असे मेसेज अमरावतीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असलेल्या नवनीत कौर राणा यांच्या समर्थनार्थ युवा स्वाभिमान पार्टीकडून वायरल होताना दिसत आहेत.

Amaravati loksabha yuva swabhimani parti navneet kaur rana will be candidate against shivsena