रायपूर : एका डिजिटल न्यूज’च्या पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या ४ स्थानिक पदाधिकाऱ्यांना काल रात्री उशीरा छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयातच सदर पत्रकाराला जबर मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. रायपूरच्या एका न्युज वेबसाईटचे पत्रकार भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे वार्तांकन करत असताना त्यांना हटकण्यात आले आणि उपस्थितांनी त्यांना जबर मारहाण केल्याचे समजते.
भारतीय जनता पक्षाचे रायपूर जिल्हाध्यक्ष राजीव अग्रवाल तसेच पक्षाचे स्थानिक नेते विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि दिना डोंगरे अशी अटक आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. स्थानिक डिजिटल न्युज’चे पत्रकार सुमन पांडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या नेत्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पत्रकार सुमन पांडे हे छत्तीसगडच्या भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचे विचार मंथन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. परंतु, संबंधित बैठक सुरू असताना अचानक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये काही विषयांवरून हमरीतुमरी झाली आणि त्यावेळी सुमन पांडे यांनी ती बाचाबाची त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. परंतु, अग्रवाल आणि त्रिवेदी हे त्यांच्या कार्यकर्त्यांसहित त्यांच्याजवळ गेले आणि संबंधित व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करण्यास सांगितला. परंतु, सुमन पांडेंनी नकार देताच अग्रवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पांडेंना मारहाण करण्याास सुरूवात केली आणि मोबाइल बळजबरी खेचून घेतला आणि त्यामधून व्हिडीओ डीलिट केला. त्यानंतर त्यांना २० मिनिटासाठी कार्यालयातच डांबून ठेवले.
दरम्यान, तिथून सुटका होताच पत्रकार सुमन पांडे यांनी इतर पत्रकारांसोबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयात ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर पांडे यांनी घडल्या प्रकाराची लेखी तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर सदर प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या ४ जणांना अटक केली आहे. दरम्यान, मारहाणीत सुमन पांडे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, परंतु सुदैवाने ती जखम गंभीर नसल्याचे वृत्त आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		