मुंबई : घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी महिला राज्य आयोगाच्या नोटीसीला उत्तर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांचं उत्तर तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केलं आहे.
परंतु, आमदार राम कदम यांनी सर्वांसमोर खुलेआम वक्तव्य केले असतानाही महिला राज्य आयोगाकडून कारवाई करण्यास दिरंगाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, महिला राज्य आयोगाकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यावर जोरदार टीका केली. रहाटकर या आता महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नसून, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. जर रहाटकर यांनी अशी गुळगुळीत उत्तरे दिली, तर महिला कोणाकडे पाहतील, असा सवाल चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ या निफाड दौऱ्यावर आल्या होत्या, दरम्यान, निफाड येथे ६४ वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळेस त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राम कदम ही एक विकृती असून, अशा विकृतीला वेळीच ठेचण्याची गरज आहे. पण, सरकार महिलांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही. परंतु, सरकारने राम कदम यांच्यासारख्या विकृतीला वेळीच ठेचले नाही, तर दुसरे राम कदम तयार होतील. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने सगळ्यांची एकच भावना निर्माण झाली आहे.
