27 July 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बेस्टचे कर्मचारी व कुटुंबीय राज ठाकरेंकडे पोहोचताच सरकारला ३ दिवसांनी जाग, मंत्रालयात बैठक

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, संप सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा बेस्टचे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘बेस्ट’ला या संपामुळे अंदाजे ५ ते ६ कोटींच्या महसुलाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. आज संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारी सुद्धा संपात सामील होतील असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सत्तेत सामील असलेल्या आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, आज संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राज ठाकरेंनी यावेळी कर्मचाऱ्यांना काही झालं तरी एकजूट राखा असा सल्ला दिला.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना सर्व अडचणी त्यांच्या कानावर घातल्या आणि लिखीत स्वरुपात आपल्या मागण्या त्यांच्याकडे दिल्या. यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा पोहोचले होते. प्रशासनाने थेट कामावर या नाहीतर घऱ सोडा अशी नोटीस कर्मचाऱ्यांना बजावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे बळजबरीने घरं सोडण्याच्या कागदपत्रांवर सही करुन घेतल्याचा आरोप त्यांनी केला प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, बेस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने राज ठाकरेंच्या भेटीला जाताच ३ दिवसापासून या संपाकडे कानाडोळा करणारे आणि झोपलेले राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या किंवा मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x