सोलापूर : मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी पंढरपुरात आषाढीची पूजा पार पडत असते आणि कायम चालत आलेली शासकीय प्रथा आहे. मराठा समाजाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची पूजा न करू देण्याचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्रात काही दिवसांपासून एका बाजूला टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामात तल्लीन झालेल्या वारकरी आणि त्यांच्या भव्य दिव्य पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंड्या आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुस्त असलेले प्रशासन आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर तसेच वेळकाढू पणामुळे नाराज झालेला मराठा समाज असं वातावरण मागील काही दिवसांपासून राज्यभर पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन तसेच चक्काजाम करायला सुरुवात केली आहे. परंतु महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका येत नसल्याने अखेर मराठा समाजाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात आषाढीची पूजा करू देणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला. त्याचाच प्रत्यय असा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी समुदायाला याची झळ बसू नये म्हणून पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची अधिकृत माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

cm devendra fadnavis will not participate in pandharpur ashadhi pooja