मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा संजय निरुपम यांनी काँग्रेस कमिटीतील उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षकांकडून फिक्सिंग केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच त्यासंबंधित अहवाल कागदपत्रांमध्ये छेडछाड करतानाचा व्हिडिओ सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या काँग्रेस निरीक्षकांची शिवजीसिंग आणि वीरेंद्र उपाध्याय अशी नावे असून ते संजय निरुपम यांच्या सांगण्याप्रमाणे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आणि बैठक संपताच संपूर्ण अहवाल फिक्स करून दिल्लीला पाठविणार असल्याचा आरोप स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप लाट असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
काय आहे तो निरीक्षकांचा नेमका व्हायरल झालेला व्हिडिओ?
