मुंबई : मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांची अवस्था म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या शहरातील रस्त्यांच्या अवस्था आणि दर्जा पाहिल्यास, त्यावरून प्रवास करण म्हणजे स्वतःचा आणि प्रियजनांचा मजबुरी म्हणून रोज जीव धोक्यात घालणे असाच म्हणावा लागेल. परंतु स्वतःची अवस्था अशी का झाली आहे याचा कधी गंभीर होऊन या शहरातील लोकांनी प्रामाणिक विचार केला आहे का?
आम्ही उपस्थित केलेले प्रश्न;
१. मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली मधील किती कुटुंबांनी आपले प्रियजन या हीन दर्जाच्या रस्त्यांवर गमावले आहेत?
२. किती लोकांनी स्वतःच्या शाररिक व्याधींना याच रस्त्यांवरून रोजच्या प्रवासादरम्यान जन्म दिला आहे?
३. किती लोकांनी याच हीन दर्जाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना कायमचे अपंगत्व स्वीकारलं आहे?
४. किती लोकांनी स्वतःच्या मेहनतीने विकत घेतलेल्या वाहनांचा चुराडा याच हीन दर्जाच्या रस्त्यांवर केला आहे?
सामान्य शहरवासीयांच्या याच सहनशक्तीचा हे राजकीय पक्ष वर्षानुवर्ष फायदा उचलत राहतात आणि प्रशासनाच्या भ्रष्ट नीतीतून स्वतःचे खिसे भरत असतात. नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे होणारा रोजचा त्रास आणि प्रवासातील रोजच्या यातना सामान्य शहरवासी सहज विसरतो आणि पुन्हा त्याच पक्षांना मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज होतो. शहरवासीयांची हीच वृत्ती भ्रष्ट पक्ष आणि नेते मंडळींना अजून प्रोत्साहन देत असते आणि तेच चक्र वर्षानुवर्षे सुरु असतं.
या शहरातील मतदारांची ही पारंपरिक पद्धतीने एखाद्या विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधून घेण्याची वृत्तीच या न बदलणाऱ्या परिस्थितीला जवाबदार आहे. त्या रस्त्यावरून आपला प्रियजन गमवू, कायमचा अपंग करू, कायमच्या शारीरिक व्याधी ओढवून घेऊ आणि लाखो रुपयांच्या गाड्यांचा चुराडा करून घेऊ, परंतु पुन्हा मतदान मात्र त्याच पक्षाला पारंपरिक पद्धतीने करू, जो या सर्व घटना आणि परिस्थितीला जवाबदार आहे. विषयाच मूळ कशात आहे हे सामान्यांना न उमगल्यानेच या शहरांतील पायाभूत सुविधांचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो करोड रुपयांचे वार्षिक बजेट असणाऱ्या या महापालिकेतील पैसा नक्की जातो तरी कुठे हे सामान्य शहरवासीयांनी कधी प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही.
आजचा आलेला दिवस कसातरी जीव मुठीत घेऊन ढकलून, शहरवासी स्वतःच स्वतःचा भविष्यकाळ भीषण करून घेत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थांड मांडून बसलेल्या त्या पक्षांना आणि प्रतिनिधींना शहरवासीयांनी एकजुटीने धडा शिकविणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’ हीच परिस्थती अजून अनेक वर्षे कायम राहणार यात काडीमात्र शंका नाही.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		