मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मराठवाडा दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींवर अधिक भर देणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पक्ष बांधणी अधिक मजबूत करून स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विशेष म्हणजे राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे सुद्धा पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान पक्षबांधणीसाठी १९ जुलै ते २५ जुलै पर्यंत राज ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड येथे दौरा नियोजित करण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये २२ जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे समजते.

त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांचा दौरा ८ ऑगस्टपासून पुन्हा करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्षांच्या मराठवाडा दौऱ्यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. एकूणच या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे पत्रकारांशी सुद्धा संवाद साधतील असं समजतं.

MNS chief Raj Thackeray will be on tour of Marathwada from 19th July