मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे. निरुपम यांच्याकडे पक्षाची अन्य जबाबदारी देऊन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवावी, असा आग्रह या नेत्यांनी खरगे यांच्याकडे धरल्याचे सांगण्यात आले.
संजय निरुपम इतर नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ते विश्वासात घेत नाहीत, अशी त्यांच्याविरोधात तक्रार आहे. पक्षात ‘एकला चलो रे’ चालत नाही, याकडे एका नेत्याने लक्ष वेधले. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राज्याची प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, त्या वेळी त्यांनी मुंबईत सलग तीन दिवस बैठका घेऊन संघटनात्मक कामाचा आढावा घेतला होता. त्या वेळी मुंबईतील काही आजी-माजी आमदारांनी निरुपम यांना बदलावे, अशी मागणी केली होती.
या भेटीदरम्यान कॉंग्रेस नेत्यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ‘संजय निरूपम हटाओ’ अशी थेट मागणी या नेत्यांनी उचलून धरली आहे. स्थानिक नेत्यांचा आक्रमकपणा पाहून याविषयी लवकरच अंतिम निर्णय घेऊ असे पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिले आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीआधी विद्यमान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरांना यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी कॉंग्रेसमध्ये पुढे आली आहे. त्यामुळे संजय निरुपम यांची गच्छन्ति होण्याची दाट शक्यता आहे.
