नवी दिल्ली : युपीएचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी जवाबदार पंतप्रधान म्हणून माझ्या मंत्रिमंडळाचा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी नेहमीच सुसंवाद राखला होता. तसेच मी कोणत्याही परराष्ट्र दौऱ्यावरून देशात परतल्यानंतर नेहमीच जाहीर पत्रकार परिषद घेत होतो, असं सुद्धा डॉ. मनमोहन सिंग आवजून म्हणाले.
मी केवळ एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हतो, तर माझ्या देशाचा एक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर सुद्धा होतो. ‘चेंजिंग इंडिया’या कार्यक्रमात सहभागी होत मनमोहन सिंग यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमधील संबंध हा पती-पत्नीसारखा आहे. या दोन्ही जवाबदार संस्थांमध्ये ताळमेळ बसेल अशा पद्धतीनं विचारांचं समाधान शोधावं लागतं. मागील काही दिवसांपासून मोदी सरकारचा आरबीआय’कडील अतिरिक्त पैशावर डोळा असतानाच माजी पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच मोदी सरकार आणि आरबीआयदरम्यान उद्भवलेल्या कलहामुळे ऊर्जित पटेल यांनी सुद्धा तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सर्व वक्तव्यांना खूप महत्व प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे माजी पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी आरबीआयचं गव्हर्नरपद सुद्धा भूषवलं होतं. त्यात मनमोहन सिंग म्हणाले, आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे आरबीआय मधील सर्व अंतर्गत विषय त्यांना अनुभवातून माहित आहेत आणि त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		