मुंबई : काही दिवसांपूर्वी अनेक केबल संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन जिओ केबलमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच अडचणींचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. जिओमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड येणार असल्याचे राज ठाकरेंच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर मनसेने थेट जिओ कंपनी सोबत पत्रव्यवहार करून त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या शहरातील हे सर्व केबल चालक मराठी असल्याने त्यांनी मदतीसाठी राज ठाकरेंकडे धाव घेतली होती. जिओ कंपनी सध्या स्पर्धेच्या नादात इतर सर्व स्पर्धकांना संपविण्याची रणनीती सर्वच क्षेत्रात राबवत आहे. त्यामुळे जिओ कंपनीच्या केबल क्षेत्रातील प्रवेशामुळे केबल चालक धास्तावले होते. परंतु राज ठाकरे यांनी केबल चालकांच्या संघटना आणि जिओ कंपनी या दोन्ही बाजू समजून घेतल्या होत्या.
त्यानंतर राज ठाकरे यांनी जिओ कंपनीने तसेच केबल चालकांनी एकत्र येऊन काम करावे आणि परस्पर सामंजस्याने व्यवहार करून दोघांनी एकमेकांचे हित जपावे असा मार्ग निवडला होता. त्याला प्रतिसाद देत जिओ कंपनीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही मागणी मान्य करत, आम्ही केबल चालकांसोबत मिळून काम करण्यास तयार असल्याची लेखी हमी दिली आहे. त्यामुळे हा केबल चालकांना मोठा दिलासा मानला जात असून, जिओ’च्या या निर्णयामुळे बेरोजगार होणाऱ्या हजारो तरुणांचा तसेच छोट्या उद्योजकांचा जीव भांड्यात पडला आहे.
