मुंबई : दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली असता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
सध्या राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले असून काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने जीव सुद्धा गमावला आहे. त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलीस वाहन सुद्धा जाळण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
मराठा समाजाची संबंधित पदाधिकारी बैठकांवर बैठका आयोजित करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यात औरंगाबाद नंतर आता थेट मुंबईपर्यंत या आंदोलनाची धग पोहोचण्याची चिन्ह आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्या बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.
