मुंबई : सध्या मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असताना सर्वच पक्षांकडून बचावात्मक प्रतिक्रिया येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोख ठोक भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त ते पुण्यात आले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यात जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. राज्य सरकार केवळ तुमच्या भावनांशी खेळ करत आहे, पण तुम्ही त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. मराठा समाजाने याआधी ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका आणि हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे भावनिक आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना केले.
या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाचा हकनाक बळी गेल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. परंतु जीव गमावून काहीही होणार नाही, त्यामुळे प्रकारच्या घटना टाळा असं आवाहन त्यांनी मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. आरक्षणाच्या मुद्यावर अधिक बोलताना ते म्हणाले की, जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. त्यामुळे मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असं आवाहन आंदोलकर्त्यांना केलं आहे.
सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याचे केंद्रीय मंत्री थावरसिंग गेहलोत यांच्या लोकसभेतील माहितीचा दाखला देताना राज ठाकरे म्हणाले की, थावरसिंग गेहलोत यांनी लोकसभेत माहिती दिली की, सरकारी रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत आणि खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. केंद्रातला मंत्री जर ही माहिती सांगत असेल तर तुम्ही कशासाठी भांडता आहात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
