मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. परंतु, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
या उत्तर भारतीय महापंचायत समितीने काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन हे आमंत्रण दिले होते. जर प्रसार माध्यम चुकीची माहिती पसरवत असतील तर राज ठाकरे यांनी स्वतः याविषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे ते आता उत्तर भारतीयांच्या प्रश्नांना थेट उत्तर देणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, उत्तर भारतीय महापंचायत समितीने सुद्धा या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केल्याचे समजते. यावेळी उत्तर भारतीयांच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही थेट सवाल विचारले जाणार आहेत आणि राज ठाकरे त्यावर त्यांची तसेच पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे नेहमीच स्वतःला उत्तर भारतीयांचे कैवारी समजणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, कारण हा कार्यक्रम त्यांच्याच लोकसभा मतदार संघात होत आहे. त्यामुळे कार्यक्रमानंतर ते सर्वात आधी माईक हातात घेतील अशी शक्यता आहे. त्यातही जर हा विषय राज ठाकरे यांच्या पथ्यावर पडला, तर संजय निरुपम यांच्या राजकीय दुकानदारीवर मोठा परिणाम होऊ शकतो असे म्हटले आहे.
तसेच सर्व भूमिका मांडल्यानंतर सुद्धा राज ठाकरे या कार्यक्रमात उत्तर भारतीयांच्या पचनी पडले नाही तरी ते कट्टर मराठी म्हणून मोठी झेप घेतील. त्यामुळे या कार्यक्रमामुळे राज ठाकरे यांचे नुकसान नसले, तरी दोन्ही बाजूने फायदा झाली तरी तो राज ठाकरे यांचाच होणार आहे असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
