पिंपरी : शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ज्या मूळ पिंपरीकरांनी निवडून दिले त्यांच्या प्रवासाच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेण्यापेक्षा पिंपरीत राहणाऱ्या ‘उत्तर भारतीयांच्या’ प्रवासाच्या समस्या अधिक महत्वाच्या वाटू लागल्या आहेत.
शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय राहत असल्याने उत्तर भारतामध्ये जाण्या-येण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात यासाठी त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन तशी मागणी केली. त्यांच्या सोबत उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनाचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग हे सुद्धा उपस्थित होते.
पुण्यातून ज्ञानगंगा एक्सप्रेस (सोमवारी) आणि ज्ञानगंगा एक्सप्रेस मांडवाडी (बुधवारी) सुटते. पुणे-गोरखपूर एक्सप्रेस ही पुणे येथून (शनिवारी) आणि गोरखपूर-पुणे एक्सप्रेस (गुरुवारी) गोरखपूर येथून सुटते. या गाड्या आठवड्यातून काही दिवसच सुटत असल्याने उत्तर भारतीय नागरिकांची अडचण होत आहे. तर या गाड्या रोज सोडाव्यात आणि अयोध्या येथे जाण्यासाठी थेट गाडीची सोय करण्यात यावी अशी मागणी खासदार बारणे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘उत्तर भारतीय सन्मान मेळाव्यात’ उपस्थित उत्तर भारतीयांना शास्वत केले होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयाच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. एकूणच निवडणूका जवळ आल्यामुळे शिवसेनेचे सर्वच शहरात जोरदार ‘उत्तरायण’ सुरु आहे.
