पटणा : युपी – बिहारींवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे गुजरातमधून उत्तर भारतीय लोकं मोठ्याप्रमाणावर गुजरात मधून पलायन करून स्वतःच्या गावाकडे पळ काढत आहेत. त्यामुळे बिहारमधील जन अधिकार पक्षाचे प्रमुख तसेच खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव गुरूवारी गुजरातला जाणार असल्याचे म्हणाले. बिहारी लोकांच्या रक्षणासाठी मी स्वतः गुरूवारी गुजरातला जाईन आणि त्यांची रक्षा करेन, हिंमत असेल तर हल्लेखोरांनी मला मारहाण करुन दाखवावी असं आवाहन पप्पू यादव यांनी दिले आहे. मी गुरूवारी गुजरातला जाईन, मग बघू कोण तेथून बिहारींना पळवून लावतं आणि मारहाण करतं, असं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना खुलं आव्हान दिलं.
त्यामुळे आधीच तापलेलं गुजरात बिहारी नेते अजून तापवत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या चितावणीखोर वक्तव्याने गुजराती समाज सुद्धा भडकण्याची चिन्ह आहेत आणि विशेष करून ठाकोर समाज ज्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच खासदार पप्पू यादव भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की, जर उत्तर भारतीयांच्या हल्ल्यामागे आमदार अल्पेश ठाकोर असतील तर त्यांना अटक का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या नवरात्रीचा माहोल असून गुजराती समाजासाठी तो अत्यंत महत्वाचा क्षण समजला जातो. परंतु त्याच काळात मुद्दाम गुजरातमध्ये जाऊन अजून तणाव वाढवून आगामी निवडणुकीत स्वतःचा फायदा करून घेण्याचा खासदार पप्पू यादव यांचा मानस दिसत आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना पप्पू यादव यांनी गुजरात भाजपावरजोरदार टीकास्त्र सोडलं. गुजरातमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी भाजपा काँग्रेसवर आरोप करण्यात मग्न आहे असं ते म्हणाले. जर भाजप म्हणते अल्पेश ठाकोर या हल्ल्यांसाठी जबाबदार आहे, मग त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल त्यांनी विचारला. आता बिहारी लोकांवरील हल्ले आम्ही सहन करणार नाही, जिथे बिहारींवर हल्ले होत आहेत आणि त्यामुळे त्याच गुजरातच्या भूमीवर जाऊन ही लढाई मी लढेन, असं पप्पू यादव भडकावू विधान करत आहेत.
जवळपास ५० हजाराहून अधिक उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना गुजरातमधून पलायन करावे लागल्याची माहिती आहे. उत्तर आणि मध्य गुजरातमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना, परिस्थिती नियंत्रणात का आणली जात नाही, असा सवाल करून राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला काँग्रेसने भाजपाला दिला आहे.
