मुंबई : ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
येथून भाजपाची लढत ही राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांच्यात होणार आहे. तसेच संजय दीना पाटील हे जोरदार तयारीला सुद्धा लागले आहेत. परंतु भाजपकडून अजून उमेदवारच निश्चित न झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. काही वर्षांपूर्वी किरीट सोमैया यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बांद्रयाचा माफिया असा करून त्यांच्या कंपन्या मणी लॉन्डरिंगमध्ये सामील असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच मुलुंडच्या डम्पिंग्राउंडच्या कचऱ्यातून पैसे कमावण्याचे पालिकेत जाळे असल्याचा आरोप करत शिवसेनेला कोंडीत पकडले होते.
त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांचा किरीट सोमैया यांना प्रचंड विरोध असून, त्यांना भाजपने उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या विरोधात काम करू अशी उघड भूमिका घेतली होती. त्यात राष्ट्र्वादीने संजय दीना पाटील यांच्यासारखा अर्थकारणात आणि आक्रमक कार्यकर्त्यांची फौज असलेला तुल्यबळ उमेदवार दिल्याने वाढल्या आहेत. त्यात मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर पट्यात मनसेची मोठी ताकद असून ती सुद्धा संजय दीना पाटील यांच्यासाठी कम्म करण्याची शक्यता आहे. त्यात जर किरीट सोमैया यांना उमेदवारी दिली गेली तर शिवसैनिक देखील संजय दीना पाटील यांच्यासाठी उघडपणे काम करतील अशी भीती स्वतः भाजपाला आहे. त्यात याच पट्यात गुजराती आकडा मोठा असला तरी मराठी आणि अल्पसंख्यांकी समाजाची आकडेवारी देखील मोठी आहे.
त्यात २०१४ मध्ये निवडणूक लढवणारे आप पक्ष यंदा महाराष्ट्राच्या आखाड्यात नाहीत आणि बसपा तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते केव्हाही संजय दीना पाटील यांच्या गळाला लागतील असं म्हटलं जात आहे. त्यात भाजप जरी मनोज कोटक किंवा इतर कोणाचा विचार करत असेल तरी त्यांना किरीट सोमैया मदत करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी या मतदारसंघात नक्की काय करावं हेच कळेना झालं आहे.
