नागपूर : नागूपर पावसाळी अधिवेशन सध्या रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे गाजत आहे. सभागृत सुद्धा धुमशान पाहावयास मिळत आहे. दरम्यान कोकणातून थेट नागपुरात दाखल झालेल्या नाणार आंदोलकांसोबत शिवसेना नेत्यांशी बाचाबाची झाल्याचे समोर आलं आहे.
नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आंदोलक नागपुरात दाखल झाले असून त्यांच्याकडून विधानभवनाबाहेर सकाळ पासून जोरदार विरोध आणि घोषणाबाजी करत होते. दरम्यान रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असता, ते केवळ निवडणुकांच्या पाश्वभूमीवर पाठिंबा देण्यासाठी आल्याचा आरोप आंदोलकांनी शिवसेना नेत्यांवर केला आणि दरम्यान आंदोलक व शिवसेना आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहावयास मिळाले.
दरम्यान नाणार प्रकल्पविरोधी मोर्च्यात सहभागी झालेलं शिवसेना नेते सभागृहाबाहेर ‘भाजप जमीन चोर आहे’ अशा घोषणा देत होते. त्यालाच अनुसरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘भाजप जमीन चोर आहे’ या घोषणा शिवसेनेने सभागृहाबाहेर देण्याऐवजी त्या सभागृहात द्याव्या, कारण विधानपरिषदेत मुख्यमंत्री या विषयावर बोलत असताना शिवसेना गप्प बसून होती. तसेच नाणार विषयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सेटिंग झाली असून शिवसेना विधानसभेत केवळ नाटकं करत असून मुळात शिवसेनाच नाणार प्रकल्पाबाबत दलाली करत असल्याचा सनसनाटी आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर केला आहे.
