मुंबई : सध्या निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन जातीय समीकरण आखण्याचा प्रयत्नं अनेक राजकीय पक्षांकडून होताना दिसेल. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला छगन भुजबळ हजर राहिले होते. त्यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडी बाजूला सारुन यापुढे फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्याच जातीय ध्रुवीकरण करण्याच्या पवारांच्या प्रयत्नांना सामना’तून लक्ष करण्यात आलं आहे. शरद पवारांनी जे पगडी राजकारण सुरु केलं आहे ते महाराष्ट्रासाठी घातक असल्याची टीका सामनातून पवारांवर करण्यात आली आहे.

नक्की काय म्हटलं आहे सामना’मध्ये?

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात क्रांतिवीर छगन भुजबळ यांच्या डोक्यावर महात्मा फुले यांचे पागोटे घातले, तर शरद पवार यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो जाणीवपूर्वक हाणून पाडला. हे ‘पगडी’नाटय़ जणू ठरवून एका विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच घडवून आणले. पुणेरी पगडी ही लोकमान्य टिळकांनी देशभर मिरवली. टिळक हे फक्त ब्राह्मण नव्हते तर भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्या-तांबोळय़ांचे पुढारी होते.

भटशाहीविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांनीही लढे उभारले, पण त्यांनी ‘ब्राह्मण’ म्हणून एका जातीचा द्वेष केला नाही. पेशव्यांचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे हे ब्राह्मण होते व ते मर्द होते. पवारांनी ‘पगडी’ नाकारून समाजात छेद निर्माण केला. खरे तर पवारांना मानाचा ‘फेटा’ही बांधता आला असता. तसे न करता आयोजकांनी ‘पगडी’ घालण्याचा प्रयत्न केला. कारण पटकथेतील प्रसंगानुसार ‘पगडी’ नाकारून पुणे – पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या मतदारांना संदेश द्यायचा होता. पवारांनी संदेश दिला. त्यामुळे पवारांचे नेतृत्व खुजे ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण असे वागल्याचे उदाहरण नाही. शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे.

NCP and sharad pawars pagadi politics is not good for Maharashtra says in saamana