मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमैय्या खासदार असून त्यांच्यापुढे संजय दीना पाटील हे तगडं आवाहन उभं करतील अशी शक्यता आहे. किरीट सोमैयांची मुख्य मतपेटी ही मुलुंडमधील गुजराती वस्ती असलेला भाग आहे, तर संजय दीना पाटील यांची मुख्य मदार ही भांडुप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल.

शिवसेनेकडून लोकसभेसाठी इथून आवाहन निर्माण करेल असा उमेदवाराचं नाही. त्यामुळे इथून मनसेतून शिवसेनेत आलेले शिशिर शिंदेंना उमेदवारीची लॉटरी लागू शकते. परंतु, त्यांच्याकडे सध्या कोणतीही राजकीय कार्यकर्त्यांची फौज नाही आणि त्यांच्या तुलनेत भांडुप आणि कांजूर परिसरात मनसेचा मोठा मतदार आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार हा केवळ भाजपची मतं फोडण्याचे काम कारेन आणि अंती राष्ट्रवादीलाच फायदा होईल अशी शक्यता आहे. त्यात जर स्थानिक मनसेने राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचा मार्ग अधिक सुखकर होईल असं येथील सध्या राजकीय वातावरण आहे.

दरम्यान, येथील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्यावर विकासाच्या मुद्यावरून स्थानिक मतदार खुश नाही. त्यात त्यांच्यासोबत असलेले अनेक मराठी कार्यकर्ते असंतुष्ट असून ते केवळ गुजराती समाजालाच जवळ करतात असा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो आहे. त्यात मनसेचे भांडुप विभाग अध्यक्ष संदीप जळगांवकर यांनी आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवाला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर याच महोत्सवाला राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांनी विशेष हजेरी दर्शवून संदीप जळगावकर यांच्यासोबत हितगुज केले होते. त्यामुळे इथे भविष्यात वेगळीच राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात. संजय दीना पाटील यांच्याकडे सुद्धा अर्थशक्ती आणि आक्रमक कार्यकर्त्यांची फौज असल्याने विद्यमान खासदारांसाठी आगामी लोकसभा निवडणूक साधी सोपी नाही आणि त्यात मोदी लाट सुद्धा राहिलेली नाही हे महत्वाचं.

ncp former mp sanjay dina patil may contest loksabha form mumbai nirth east seat