सोलापूर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते सोलापुरातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सोलापुरात भाजपने एखाद्या पूर्वनियोजित इव्हेंटप्रमाणे तयारी केल्याचे निदर्शनास येत होतं. तसेच, सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या मोठ्या स्वागतासाठी पोस्टर्स आणि होर्डिंग्सचा सुळसुळाट करण्यात आला आहे.
मोदी सरकारचा कार्यकाळ संपायला आला तरी अजून भूमिपूजन म्हणजे केवळ निवडणुकीचे स्टंट असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. दरम्यान, आजच्या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध कामाचे उद्घाटन, तसेच माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल ३० हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी, व्यासपीठावर नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतुक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपामधील वरिष्ठ नेतेमंडळी तसेच मंत्री, आमदार, खासदार तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख सुद्धा उपस्थित होते हे विशेष म्हणावे लागेल.
विशेष म्हणजे २०१४ प्रमाणे भाषणादरम्यान मोदी-मोदी-मोदी नावाने होणारी नारेबाजी म्हणजे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मितीसाठी ठरवून केलेली घोषणाबाजी असे निदर्शनास येत होते. तसेच भाषणापूर्वी प्रसारित करण्यात आलेली सोलापूर शहराची व्हिडिओ थ्रीडी म्हणजे सोलापूर शहर जणू अमेरिकेची राजधानी असावी असे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे भाजपने पुन्हा २०१४मधील प्रचाराचे तंत्र अमलात आणले आहे, असे म्हणावे लागेल.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		