पाटणा : २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार तसेच प्रसिद्ध निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सत्ताधारी पक्ष जदयू’मध्ये प्रवेश घेऊन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. रविवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला आणि सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
२०१५ मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तसेच नितीश कुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये कॉग्रेससाठी काम केलं आणि पंजाबमधील काँग्रेसच्या विजयात हातभार लावला होता. परंतु, त्यानंतर काही करणास्थव त्यांचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संबंध ताणले गेले आणि काही अंशी ते भाजप पासून दुरावले होते. परंतु त्यांच्यासोबत भाजपने पुन्हा जवळीक साधण्यास सुरुवात केली असून, दिल्लीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे २०१५ ला ऑक्टोबरमध्ये टांझानिया देशात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले जॉन मॅगफली यांच्या प्रचाराची जबाबादरीही प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ संस्थेकडेच होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘चाय पर चर्चा’ असो की ‘थ्रीडी सभा’ या नव्या संकल्पना प्रशांत किशोर यांच्याच होत्या. त्यामुळेच मोदी देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून राजकीय प्रवेशाची बातमी बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु, कोणत्या पक्षात ते मात्र स्पष्ट केलं नव्हतं. आज मात्र त्यांनी जदयूत प्रवेश करून त्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.
Election strategist Prashant Kishor joins JDU in the presence of Bihar Chief Minister Nitish Kumar in Patna pic.twitter.com/UAkF3df2ee
— ANI (@ANI) September 16, 2018
