नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान घोटाळ्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या घोटाळ्याचे रहस्य गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने केला आहे.

राफेल लढाऊ विमानांच्या’बाबत मनोहर पर्रिकरांकडे खूप महत्वाची माहिती असून ती बाहेर येणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरूच्चार सुद्धा त्यांनी पुन्हा केला.

महत्वाचं म्हणजे सुरजेवाला यांनी यावेळी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत सादर केली. यात राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल लढाऊ विमानांच्या घोटाळ्याशी संबंधित महत्वाची माहिती असल्याचे म्हणत आहेत. ही ऑडिओ क्लिप कधीची आहे हे मात्र सुरजेवाला यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांकडे राफेल घोटाळ्याशी संबंधित मोठी माहिती आहे. आणि ती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.

दरम्यान, मोदी एकटे फ्रान्स, पॅरिसमध्ये गेले होते. त्यांच्या शिष्टमंडळात उद्योगपती अनिल अंबानी होते. विशेष म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान आणि अनिल अंबानी पॅरिसमध्ये राफेल खरेदीच्या व्यवहारासाठी गेले होते, तेव्हा आपले संरक्षण मंत्री गोव्यात मासे खरेदी करत होते. त्यामुळे याची चौकशी व्हायलाच हवी. मोदी हे संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते समितीला सुद्धा कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत, असे सुरजेवाला यांनी म्हटले.

rafale fighter jet deal scam documents in goas cm manohar parrikars bedroom says congress