28 June 2022 11:13 AM
अँप डाउनलोड

अनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी

लंडन : जगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.

राहुल गांधी लंडन दौऱ्यावर आले असता नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अ‍ॅल्युमनी युनियन या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे हा गंभीर आरोप मोदी सरकारवर केला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी केवळ एका उद्योगपतीला लाभ मिळण्यासाठी राफेल विमान खरेदी करारात हवे ते बदल केले. विशेष म्हणजे या उद्योगपतीला विमाने बनवण्याचा अनुभव सुद्धा नाही. तरीसुद्धा केवळ त्या उद्योगपतीच्या लाभासाठी पूर्वीच्या काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने कमी किमतीत केलेला करार भाजपच्या सरकारने बदलला आणि त्यात विमानांच्या किंमत तिप्पट वाढवण्यात आल्या असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षांच्या थेट रोख हा रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांच्यावर होता. काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी समूहाने काँग्रेसच्या अनेक नेत्यांना राफेल कराराबाबत वक्तव्य केल्याने कायदेशीर नोटिस पाठवल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस राफेल खरेदीबाबत अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील भ्रष्टाचारावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, एचएएल कंपनी मागील सत्तर वर्षे विमाने तयार करीत असून, त्यांच्यावर कोणतेही कर्ज सुद्धा नाही. तत्कालीन काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने दसॉल्ट कंपनीशी राफेल विमानांचा करार करून त्याचे कंत्राट एचएएलला या अनुभवी भारतीय कंपनीला दिले होते. त्यावेळच्या करारानुसार एका विमानाची किंमत ५२० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

परंतु जेव्हा भारतात नव्या सरकारची स्थापना झाली आणि पंतप्रधान मोदी फ्रान्सला गेले. त्यावेळी त्यांनी १२६ विमानांऐवजी ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला. त्यानंतर राफेलच्या प्रत्येक लढाऊ विमानाची किंमत ५२० कोटीवरून तब्बल १६०० कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली. त्यानंतर ही राफेल विमाने बनवण्याचे कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यात आला. अनिल अंबानी यांच्यावर तब्बल ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. परंतु त्यांच्या कंपनीने आयुष्यात कधीही विमान बनविण्याचा अनुभव नाही. तरीसुद्धा त्यांच्या कंपनीला राफेल लढाऊ विमाने तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले. विशेष म्हणजे जगातील हे सर्वात मोठे संरक्षण कंत्राट होते असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, अनिल अंबानींच्या समूहाने सर्व आरोप फेटाळले असून, अनिल अंबानी यांनीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून काँग्रेसला चुकीची माहिती मिळाली असून, काही हितसंबंधी लोक तसेच कंपनीचे शत्रू काँग्रेसची दिशाभूल करीत असल्याचे त्या पत्रात म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x