रंग शारदामध्ये नेहमी नाटकाचे प्रयोग होतात तसाच १ नाटकाचा प्रयोग काल झाला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला पदाधिकारी मेळावा अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता आणि ते अधोरेखित करणारे त्यांचे आजचे भाषण होते.

मला आश्चर्य वाटतं राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते आहेत परंतु भारतीय सैन्याने केलेल्या शौर्यावर शंका घेऊन ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का? आणि त्यांच्या सारख्या मोठ्या राजकारण्याला ते अजिबात शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली. तसाही पोपटाचा रंग हिरवा असतो आणि तो पाकिस्तानचा तर नाही ना असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

ज्या प्रकारे त्यांनी मोदी-शहा विरोधात भूमिका घेतली त्या प्रकारे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने १ तरी लोकसभा निवडणुक लढवावी आणि जिंकणं तर सोडाच साधं डिपॉजिट तरी वाचवून दाखवावं असं आव्हान विनोद तावडेंनी राज ठाकरें यांना केलं.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
राज ठाकरे हे बारामतीचे पोपट आहेत आणि जेव्हा बारामतीला पोपटाची गरज पडते तेव्हा ते एखादा नवीन पोपट शोधून काढतात आणि सध्या राज ठाकरे हे त्यांचे पोपट आहेत. राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट आजकाल बारामतीहून येते अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केली होती.

राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे
– हि लढाई मोदी-शाह विरुद्ध देश अशी आहे
– लोकसभा इलेक्शन हे भारताचे आहे नेपाळचे नाही
– मोदींची शरद पवार यांच्या बद्दलची बदलती भूमिका
– लोकसभेसाठी भाजप सोडून कोणालाही मदत करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आव्हान
– चौकीदार हे नवीन ‘गिमिक’ आहे. तुम्ही प्रश्न विचारू नयेत म्हणून ही गिमिक आहेत. माझं सर्वपक्षीयांना आवाहन आहे कि, त्याला उत्तर देत त्यात गुरफटू नका मागच्या ५ वर्षाच्या मोदी सरकारच्या अपयशावर प्रश्न विचारात राहा.
– मी माझ्या आयुष्यात नरेंद्र मोदींइतका खोटा पंतप्रधान कधीच पाहिला नाही.
– २०१५ पासून २०१९ पर्यंत महाराष्ट्रात १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, नरेंद्र मोदींना ह्या गंभीर प्रश्नाकडे पाहायला वेळ नाही.
– नरेंद्र मोदी स्वतःला ‘प्रधान सेवक’ म्हणवतात पण हा मूळ शब्द पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे, तीन मूर्ती भवनात एका तस्वीरीवर नेहरूंचं विधान लिहिलं आहे ‘देशानं मला प्रथम सेवक समजावं’
– देशाच्या नव्या प्रारंभासाठी मोदी-शाह हे राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे
– नरेंद्र मोदी हे कसलं चौकीदार मोहीम चालवत बसलेत, जरा मोठा विचार करा, ह्यांच्याकडे काही दाखवण्यासारखं नाही म्हणून हे चौकीदार कॅम्पेन आहे

Raj Thackeray should contest at least 1 parliamentary seat and save deposit, BJP minister vinod tawade challenge Raj Thackeray