ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ते मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत. पुढील महिन्याच्या १ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून त्याआधी त्यांनी ठाणे दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले आहे.
ठाण्यातील पक्ष संघटन मजबूत करून संपूर्ण ठाण्यात पक्षाला बळकटी देणे हा त्यामागचा उद्देश आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा घेतला होता. तेंव्हा राज ठाकरेनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून काही सूचना मागविल्या होत्या. तर आज ते पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत.
ठाण्यात मनसेचे १२६ पदाधिकारी असून त्यांनी जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवून लोकपयोगी कामं करण्यावर कसा भर द्यावा यासाठी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. एकूणच पक्ष बांधणीला राज ठाकरे यांनी अधिक महत्व दिल असून ते सुद्धा स्वतः मेहनत घेताना दिसत आहेत. युतीच्या कारभारानंतर मनसे बद्दल सामान्य मराठी माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाचं वलय अधिक गडद होताना दिसत आहे, ज्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच होताना दिसेल.
