मुंबई : राज्यात मागील ४ वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख घटक असलेली शिवसेना मागील साडेचार वर्षांपासून केंद्रात सुद्धा भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आहे. वास्तविक सामान्य लोकांना भाजप आणि शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष उत्तर देण्यास बांधील असताना शिवसेना सामान्यांना केवळ भाजपच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात व्यस्त आहे असे दिसते.
कारण आजच्या सामना या मुखपत्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपाने जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की,”सध्या सत्ता मिळताच आश्वासनांचा विसर, हे जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे; अशी टीका उद्धव ठाकरेंनी संपादकीय मधून केली आहे. तसेच बाहेरच्या राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान घसरलेल्या पातळीवरुन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि तसेच विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
त्यांनी पुढे असे सुद्धा म्हटले आहे की, मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले? जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
वास्तविक सध्या राम मंदिराशिवाय दुसरं काहीच न दिसणाऱ्या आणि सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेने सुद्धा सामान्यांना नोकर्या, भूक आणि महागाई अशा महत्वाच्या विषयांवर उत्तर देणे अपेक्षित आहे. कारण या विषयांवर जशी जाहिरातबाजी भाजपने २०१४ मध्ये केली होती, तशीच ती शिवसेनेने सुद्धा केली होती. नोकर्या, भूक, महागाई आणि दुष्काळासारख्या गंभीर विषयापासून सामन्यांना विचलित करण्यासाठी राम मंदिरासारखा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर उचलून केवळ मतदारांची दिशाभूल करण्याचे केलविलवाणे प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहेत. सामान्यांना महागाईमुळे रोजचे जगणे असह्य झाले आहेत आणि आजचा दिवस कसा जाईल जाची चिंता अधिक सतावते आहे. मंदिर आणि धर्मात त्यांना काहीच रस नसून उद्या ते मतदान पेटीतून व्यक्त झाल्यास नवल वाटायला नको.
