मुंबई : कुर्ल्यातील उद्यानासाठीची आरक्षित असलेला सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा भूखंड मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर नामंजूर करणाऱ्या शिवसेनेने शुक्रवारी या मुद्यावर अक्षरशः माघार घेतली. सुधार समितीचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप लांडे यांच्या दबावाखाली हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्यासाठी शिवसेनेने प्रस्ताव नामंजूर केल्याची तीव्र टीका झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिकेतील नेतेमंडळींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सदर प्रस्ताव पुन्हा पालिकेकडे आणून भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर विषय अंगलट येऊ शकतो याची जाणीव होताच शिवसेनेने युटूर्न घेतला आहे. संबंधित विषयावर पालिकेत साथ देणारी भाजप मात्र पालिकेच्या बाहेर येताच पलटल्याचे पहायला मिळाले होते. एल विभागातील कुर्ल्यातील भुक्रमांक १६, २८ आणि २९ या उद्यानासाठी हा भूखंड राखीव असल्याचे समजते. सदर प्लॉटमध्ये शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांचा हात असल्याचे समजले जाते आहे. तसेच ते सुधार समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनीच सभागृहात सर्व हालचाली केल्या होत्या असा विरोधकांचा आरोप आहे.

विशेष म्हणजे याच भूखंडावर नगरसेवक दिलीप लांडे यांचे निवासस्थान असल्याने त्यांनी याची कोणालाही पूर्व कल्पना न देता बाळ नर यांच्या माध्यमातून उपसूचना मांडून हा प्रस्ताव नामंजूर केल्याचे असे शिवसेनेच्या पालिकेतील इतर नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे वृत्त आहे. दरम्यान मनसेतून शिवसेनेत येताच आणि सुधार समिती अध्यक्षपद असल्याने त्यांनी शिवसेनेतील कोणालाही पूर्व सूचना न देता परस्पर सर्व बाबी अंधारात ठेऊन या हालचाली केल्याने शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी संतापले आहेत असं समजतं.

दरम्यान, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई महानगर पालिका महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी प्लॉट मिळत नसताना सत्ताधारी शिवसेनेला बिल्डरांच्या घशात घालायला प्लॉट कसे काय उपलब्ध होतात असा प्रश्न विरोधक विचारात आहेत. त्यामुळे सध्या दिलीप लांडे यांच्याबद्दल शिवसेनेत रोष पहायला मिळत आहे. दिलीप लांडे सध्या चांदिवली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सदर प्रकरण त्यांना भोवल्यास त्यांची गच्छंती होण्याची शक्यता आणि अंतर्गत स्पर्धक आक्रमक झाल्यास नवल वाटायला नको.

shivsena chief udhav thackeray and shivsenas senior leaders in bmc corporation not happy with former MNS corporator dilip lande